
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळून जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळपर्यंत अखंड सुरूच होता. दक्षिण मुंबईतील काही भागांत 24 तासांत 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
🌧️ हवामान खात्याने मुंबई महानगरात आज अतिमुसळधार (Red Alert) तर, सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) अंदाज वर्तवला आहे. 🚨
🌧️ सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे.
🙏कृपया,… pic.twitter.com/Y7xUTFi5bk
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 28, 2025
पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. तरीदेखील लोकल रेल्वे सेवा आणि बेस्ट बस वाहतूक अडथळ्याविना सुरू राहिल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मध्य व पश्चिम रेल्वेवरील गाड्या काही प्रमाणात उशिराने धावत होत्या, मात्र सेवा बंद पडली नाही.
भारतीय हवामान खात्याने (IMD) शनिवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला होता. रविवारी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे किती पाऊस?
• जुहू : ८८ मिमी
• वांद्रे : ८२.५ मिमी
• महालक्ष्मी : २८ मिमी
मुंबईसह शेजारील ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.