
मुंबई प्रतिनिधी
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यातील तब्बल २२ जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून (#IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ऑरेज आणि रेड अर्लट असलेल्या जिल्ह्यांना खबरदारी व पूर्वतयारीची… pic.twitter.com/Q9XmJLPuIq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2025
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आधीच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना, पुढील दोन दिवस ही स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर, धाराशिव, जालना आणि लातूरसारख्या जिल्ह्यांत नुकत्याच पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वारे पश्चिमेकडे सरकत आहेत. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येणार असून २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
शनिवार, २७ सप्टेंबर
नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, बीड, अहिल्यानगर
रविवार, २८ सप्टेंबर
सोलापूर, पुणे, सातारा, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर
लातूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू असून आज दिवसभर लातूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा कायम राहणार आहे.
नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.