
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वाहतूक व संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली असून, हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
आयोगाच्या निवेदनानुसार, ही परीक्षा आता सुधारित तारखेनुसार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. यामुळे याच दिवशी नियोजित असलेली गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ नव्या तारखेला पार पडणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्र शुद्धिपत्रकाद्वारे जाहीर होणार आहे.
उमेदवारांच्या खात्यामध्ये आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ते डाउनलोड करून प्रिंट स्वरूपात परीक्षा केंद्रावर आणणे बंधनकारक आहे. जुन्या प्रवेश प्रमाणपत्रावर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर केंद्रावर हजर राहावे. कक्षातील बैठक क्रमांकावर परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य असून, ठराविक वेळेनंतर प्रवेश देण्यात येणार नाही.
आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. प्रवेश प्रमाणपत्र मिळविताना अडचण आल्यास contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ई-मेलवर अथवा ०२२-६९१२३९१४ / ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.