
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीपूर्वी म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) यंदा प्रत्येक कर्मचाऱ्याला तब्बल २५ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे म्हाडा कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
अलीकडेच झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत बोनसविषयक प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा विचार करून अखेरीस सर्वसंमतीने २५ हजार रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २३ हजार रुपयांचा बोनस मिळाला होता. यंदा संघटनांनी बोनसवाढीवर ठाम भूमिका घेतली होती. काही संघटनांनी थेट ३० हजारांची मागणी केली होती. मात्र तोलामोलाचा निर्णय घेत प्राधिकरणाने २५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही लवकरच बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनस मिळाला होता. यंदा त्यात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बोनसवाढीमुळे म्हाडा कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद अधिकच गोड झाला आहे.