
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाबरोबरच उजनी धरणातून भीमा नदीत आणि सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील शेकडो गावे पुराच्या पाण्यात अडकली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नद्यांना आले पूरपाणी
सीना,कोळेगाव, चांदणी, खासापुरी, भोगावती या धरणांतून सोडलेले पाणी सीना नदीत मिळाल्याने नदीने पात्र ओलांडले आहे. नदीकाठच्या खेड्यांमध्ये पाणी शिरले असून शेतजमिनीही जलमय झाल्या आहेत. भीमा नदीत उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर व मोहोळ परिसरात पुराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाची धावपळ
अचानक वाढलेल्या पाण्यामुळे करमाळा, माढा आणि मोहोळ तालुक्यातील नागरिक अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अकरा बोटी व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले आहे. या बोटी दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्याला गती मिळणार आहे.
दारफळमध्ये गंभीर स्थिती
माढा तालुक्यातील दारफळ येथे अनेक नागरिक पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असले, तरी पूरपाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने नागरिकांना बाहेर काढणे कठीण ठरत आहे. त्यामुळे लष्कराची मदत मागवण्यात आली असून, हेलिकॉप्टरद्वारे नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू आहे. लवकरच लष्करी पथक घटनास्थळी पोहोचणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त एनडीआरएफ पथक
राज्य नियंत्रण कक्षाशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफचे आणखी एक पथक माढा तालुक्यात पाठवले आहे. ते पुढील काही तासांत बचावकार्याला सुरुवात करणार आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतकार्याला गती दिली आहे. माढ्याचे आमदार अभिजित पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रीपासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सक्रिय आहेत.
प्रशासनाचे आवाहन
पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व तालुकास्तरीय यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता थेट जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३१०१२ असा असून, मदतीची आवश्यकता असल्यास लगेच कळविण्याची विनंती प्रशासनाने केली आहे.
जनजीवन विस्कळीत
पूरामुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतजमिनी वस्तींसह जलमय झाल्याने पशुधनासह मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे.