
पुणे प्रतिनिधी
घरगुती वाद, पत्नीचा सातत्याने सासूपासून वेगळं राहण्याचा हट्ट आणि पोलिसांत वारंवार केलेल्या तक्रारींना कंटाळून एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अक्षय विजय साळवे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी येरवडा पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली.
काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अक्षयची पत्नी वारंवार वेगळं राहण्याचा आग्रह धरत होती. त्याचबरोबर पतीविरोधात अनेक वेळा विनाकारण पोलिसांत तक्रारीही दाखल करत होती. त्यामुळे घरात सतत वादाचे वातावरण होते.
आत्महत्येच्या आदल्या रात्री अक्षयने आईला फोन करून पत्नीशी पुन्हा वाद झाल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी, १९ मे रोजी सकाळी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही त्याने पत्नीच्या वादाला कंटाळल्याचं स्पष्ट केलं आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अक्षयची पत्नी (वय २४) व तिची आई (रा. गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.