
पुणे प्रतिनिधी
पुण्यासारख्या वाढत्या खर्चाच्या शहरात सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणे अजूनही स्वप्नवत ठरत आहे. मात्र म्हाडा मंडळाने या स्वप्नाला गवसणी घालणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे मंडळामार्फत तब्बल ६,१६८ घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली असून, यातील घरे २० लाखांपासून ४० लाखांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध होणार आहेत.
म्हाडाच्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या हद्दीत १,५३८, पिंपरी-चिंचवडमध्ये १,५३४, तर पीएमआरडीए क्षेत्रात १,११४ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर १,६८३ घरे आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील २९९ सदनिकांचाही समावेश लॉटरीमध्ये करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांत म्हाडाने तिनदा लॉटरी जाहीर केली असून, त्याचा फायदा सामान्य कुटुंबांना झाला आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड परिसरात घरांसाठी मोठी मागणी लक्षात घेता, चाकण आणि नेरे भागांमध्ये नवे प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक
या लॉटरीची अधिकृत घोषणा ११ सप्टेंबर रोजी झाली असून, इच्छुकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाणे आवश्यक आहे.
प्रारंभिक अर्ज यादी : ११ नोव्हेंबर
दावे व हरकतींसाठी अंतिम मुदत : १३ नोव्हेंबर
अंतिम अर्ज यादी : १७ नोव्हेंबर
लॉटरीचा निकाल : २१ नोव्हेंबर
पुणे म्हाडा मंडळाच्या या सोडतीमुळे परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.