
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : राज्यातील उच्च महाविद्यालये व विद्यापीठांमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता मार्गी लागणार आहे. एकूण सहा हजार २०० प्राध्यापकांसह दोन हजार ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुढील महिनाभरात या नियुक्त्या पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही वर्षांपासून प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक व प्रशासकीय अडथळ्यांमुळे विलंब झाला होता. राज्यपाल पदावरील मतभेद तसेच भरतीची पद्धत यावरील चर्चेमुळे प्रक्रिया थांबली होती. मात्र, वित्त विभागाच्या मंजुरीनंतर नियुक्त्यांना आता गती मिळणार आहे.
अकृषिक विद्यापीठांतील २९०० प्राध्यापकांपैकी २२०० जणांची भरती आधीच झालेली आहे. उर्वरित ७०० जागा महिनाभरात भरल्या जाणार असून पुणे तसेच इतर विद्यापीठांतील मुलाखती पंधरवड्यात पार पडतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. सोलापूर विद्यापीठ व संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील रिक्त पदांनाही यामुळे भरतीचा दिलासा मिळणार आहे.
कंत्राटी प्राध्यापकांसाठी निधी
अनुदानित जागा भरल्यानंतरही विविध कॅम्पसवर मनुष्यबळाची कमतरता असल्यास कंत्राटी स्वरूपात प्राध्यापक नेमले जातात. त्यांचा पगार विद्यापीठ स्वनिधीतून भागवतो. तथापि, निधीअभावी अडचणी आल्यास उद्योगसंस्थांच्या ‘सीएसआर’ निधीतून किंवा अन्य माध्यमांतून पगारासाठी मदत केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.