
मुंबई प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यामधील दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार, दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीत एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत.
सद्यस्थितीत या योजनांतर्गत लाभार्थ्यांना १५०० रुपये मिळत होते. मात्र, दिव्यांग कल्याण संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनंतर सरकारने या रकमेतील वाढ मान्य केली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी ५०० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत पावणेदोन लाख लाभार्थी असून त्यापैकी आठ ते नऊ हजार लाभार्थी दिव्यांग आहेत. या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले की, वाढीव अनुदानाची अंमलबजावणी येत्या ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांच्या हाती वाढीव निधी पोहोचणार आहे.