
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग भारतीय जनता पक्षाने सोमवारी वरळीवरून औपचारिकपणे फुंकलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या बालेकिल्ल्यातील ‘विजयी संकल्प मेळाव्या’तून जोरदार हल्ला चढवत महापालिकेवर महायुतीचं वर्चस्व आणण्याचा विश्वास व्यक्त केला. “लिहून ठेवा, रेकॉर्ड करा काहीही झालं तरी मुंबईवर महायुतीचाच झेंडा फडकणार. महापौर हा महायुतीचाच होणार,” असे ठाम उद्गार त्यांनी काढले.
महापालिका रणांगणाची पहिली गर्जना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी सर्वच पक्ष आता मोर्चेबांधणीला लागले आहेत. मेळावे, आंदोलनं, संपर्क दौरे यांतून वातावरण रंगतं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने वरळीतील मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फोडत आगामी लढतीत आक्रमकतेचा सूर लावला. वरळी हा उद्धव ठाकरे गटाचा गड मानला जातो. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघही याच भागात आहे. त्यामुळे फडणवीसांची गर्जना विशेष लक्षवेधी ठरली.
“मुंबई जिंकूनच राहणार”
फडणवीस म्हणाले, “२०२४ मध्ये आपण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन केलं. आता पुढचा टप्पा म्हणजे मुंबई महापालिका. काही झालं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार. ते झाल्याशिवाय भाजप कार्यकर्ताही स्वस्थ बसणार नाही. कोणी बरोबर आलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल,पण विजय महायुतीचाच होणार.
ठाकरे गटावर तुफान हल्ला
या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांवरही फडणवीसांनी जोरदार टीका केली.
“ठाकरे यांच्या भाषणाला मी शंभर रुपयेसुद्धा देणार नाही. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही. ते आज ‘मराठी मराठी’ करत आहेत. पण मुंबईचा मराठी माणूस बाहेर ढकलला गेला तो त्यांच्या कारभारामुळेच,” असा आरोप त्यांनी केला.
बेस्ट पतपेढी निवडणुकीचा दाखला देत त्यांनी चिमटा काढला: “काही जण सतत ‘आमचा ब्रँड’ म्हणत होते. काय झालं? त्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला, आणि तो आमच्या शंशाक राव, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी वाजवला.
“ब्रँड म्हणजे बाळासाहेब, तुम्ही नाही”
फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष प्रहार करत सांगितलं, “फक्त नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते. तुम्ही ब्रँड नाही. आमच्या पक्षाची परंपरा बघा – आशिष शेलारांच्या जागी त्यांचा मुलगा अध्यक्ष होत नाही, तर कार्यकर्ता अमित साटम होतो. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
“मोदी हेच जगातील सर्वात मोठे ब्रँड”
भाजपच्या कार्यकर्त्यांमधून नेतृत्व घडत असल्याचा दाखला देताना फडणवीस म्हणाले, “चहा विकणारा देखील जागतिक ब्रँड होऊ शकतो, हे नरेंद्र मोदींनी सिद्ध केलं. आज जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे नरेंद्र मोदी. त्यामुळे उगाच आम्हाला ब्रँड सांगू नये.
राजकीय तापमान चढणार
मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचं वर्चस्व राहिलं. मात्र, शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची ताकद परीक्षेला लागली आहे. अशा वेळी भाजपने ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातून दिलेली ही आक्रमक हाक मुंबईच्या राजकारणाचं तापमान नक्कीच वाढवणारी ठरणार आहे.