
नाशिक रोड प्रतिनिधी
नाशिक रोड परिसरात शनिवारी (ता. १३) पहाटे मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली उडी घेऊन एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जेल रोड-पवारवाडी परिसरातील रेल्वेमार्गावर पहाटे दोन ते तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नसली, तरी प्राथमिक तपासातून हे तरुण-तरुणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतांच्या ओळखीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, अंगावर काळी पॅन्ट, काळा हाफ शर्ट आणि पांढरे जॅकेट होते. तरुणीचे वय २० ते २२ वर्षे असून, तिने निळ्या रंगाची लेगींग्ज पॅन्ट, निळ्या-पांढऱ्या चौकटींचा टॉप व जॅकेट घातले होते.
घटनास्थळी आढळलेल्या सिटीलिंक बसच्या तिकिटांवरून शुक्रवारी हे दोघे बेजे फाटा (त्र्यंबकेश्वर) येथून बसने प्रवासाला निघाले होते. नंतर रविवार कारंजा येथे उतरल्यानंतर त्यांनी नांदूर नाका मार्गे नाशिक रोडकडे प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी पवारवाडी-जेल रोडकडे जाण्याची चौकशी बसचालक व वाहकांकडे केली होती.
त्यानंतर रात्री सुमारे नऊच्या सुमारास सैलानी बाबा चौकात उतरून ते रेल्वे ट्रॅकजवळ गेले. अंदाजे पहाटे दोनच्या दरम्यान त्यांनी मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आपले जीवन संपवले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप कुऱ्हाडे तपास करीत आहेत.