
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका केवळ रेल्वे वाहतूक आणि रस्त्यांनाच नव्हे तर मोनोरेललाही बसला आहे. आज सकाळी वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल पुन्हा बंद पडली. या गाडीत अडकलेल्या १७ प्रवाशांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढलं.
#WATCH | Maharashtra: A monorail comes to a halt in the Wadala area of Mumbai due to technical glitches. Details awaited. pic.twitter.com/XQMnINKkFx
— ANI (@ANI) September 15, 2025
चेंबूरकडे जाणारी ही मोनोरेल अचानक थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मोनोरेलचा ट्रॅक जमिनीलगत नसल्याने रेस्क्यू करणे कठीण होतं. मात्र अग्निशामक दलाने शिस्तबद्ध पद्धतीने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. नंतर या मोनोरेलला कपलिंग करून कारशेडकडे हलवण्यात आलं असून बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मोनोरेल सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९ ऑगस्टला मुसळधार पावसाच्या दिवशी अशीच मोनोरेल थांबली होती. त्यावेळी काही तास प्रवासी आत अडकून पडले होते. एसी व लाईट बंद झाल्याने लोकांना गुदमरल्यासारखं होऊन आरडाओरडा सुरू झाला होता. शेवटी अग्निशमन दलाने काच फोडून लोकांना बाहेर काढलं होतं. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल बंद पडल्याचं कारण त्यावेळी दिलं गेलं होतं.
मात्र महिन्याभरात तिसऱ्यांदा मोनोरेल बंद पडल्याने प्रवासी वैतागले आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्ग विस्कळीत असताना लोकांनी मोनोरेलचा पर्याय निवडला, पण वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरतो आहे.