
मुंबई प्रतिनिधी
राज्यात पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील तब्बल 15,631 पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र शिपाई आणि कारागृह शिपाई अशा पाच संवर्गातील पदांचा समावेश असून, जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे, सन 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी शासनाने देण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की या कालावधीत कमाल वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांना देखील या भरतीत सहभागी होता येईल.
गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्याने हजारो उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले होते. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटना आणि उमेदवारांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर शासनाने दिलासा देत हा निर्णय घेतला आहे.
पदांचा तपशील
* पोलीस शिपाई : 10,908
* पोलीस शिपाई चालक : 234
* बॅण्डस्मन : 25
* सशस्त्र पोलीस शिपाई : 2,393
* कारागृह शिपाई : 554
* एकूण : 15,631 पदे
गृह विभागाच्या आवाहनानुसार, उमेदवारांनी ही संधी न गमावता अर्ज दाखल करून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. लवकरच अर्ज सादरीकरणाची तारीख आणि परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध होणार असून, अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांनी नियमितपणे अद्ययावत माहिती पाहावी, असेही सांगण्यात आले आहे.