
मुंबई प्रतिनिधी
फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित झाले आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी फडणवीस यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचेही प्रकाशन झाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर फडणवीस म्हणाले, “गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पत्रकार आणि राजकारणी ही लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. पत्रकारांचा टीकेचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, मात्र त्याचवेळी आमची बाजूही ऐकली जावी. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सकारात्मक विचारसरणीमुळे अनेक उपयुक्त कामे घडली. जलयुक्त शिवार योजना आणि शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम हे गुरुदेवांच्या प्रेरणेतून शक्य झाले. आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्त्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून जलसंधारणात महत्त्वाचे योगदान दिले. भारतीय योग, आयुर्वेद आणि चिकित्सा परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्यात श्री श्री रविशंकर यांचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले.
श्री श्री रविशंकर यांनी यावेळी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी, सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे, लोकमत समूहाचे संपादक विजय बाविस्कर, एबीपी माझाच्या संपादक सरीता कौशिक, पुढारीचे संपादक विवेक गिरधारी यांच्यासह पत्रकार आणि अनुयायी उपस्थित होते.