मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कामाच्या तासांमध्ये वाढ करून दररोज १२ तास काम करण्याची परवानगी दिली आहे.
ओव्हरटाइमसाठी कामगारांची लेखी संमती अनिवार्य असून, दुप्पट वेतनाचा मोबदला देणे बंधनकारक आहे.
हे नियम २० किंवा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये लागू होतील.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील उद्योग आणि कामगार धोरणात मोठे बदल करत कारखाना कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा अंतर्गत कामाच्या तासांमध्ये वाढ करण्यात आली असून, आता कामगारांना दररोज १२ तासांपर्यंत काम करावे लागू शकते. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
कायद्यात काय बदल करण्यात आले?
महाराष्ट्र सरकारने कारखाना अधिनियम 1948 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. यानुसार, कामाचे दैनिक तास ९ वरून १० आणि साप्ताहिक तास ४८ वरून ६० पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
तसेच, ओव्हरटाईमसाठीची मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, ओव्हरटाईमसाठी लेखी संमती घेणे अनिवार्य केले आहे. कामगारांच्या संमतीशिवाय कोणत्याही कामगाराला अतिरिक्त तास काम करावं लागणार नाही.
ओव्हरटाईमसाठी मोबदला
कामाचे तास वाढले असले तरी त्याबदल्यात कामगारांना दुप्पट वेतनाने ओव्हरटाईमचा मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे.
कोणत्या ठिकाणी हे नियम लागू होतील?
हे नियम २० किंवा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांवर लागू होणार आहेत. यामध्ये दुकाने, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, उद्योग संस्था यांचा समावेश आहे.
या निर्णयामागचं उद्दिष्ट काय?
* राज्यातील उद्योगांना चालना देणे
* गुंतवणूकदारांना आकर्षित करणे
* रोजगाराच्या संधी वाढवणे
* Ease of Doing Business मध्ये प्रगती
सरकारचं म्हणणं काय आहे?
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले की, “हे बदल कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवून उद्योगांना लवचिकता देतील. दोन्ही घटकांचे हित जोपासणे हेच या सुधारणेचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले
महत्त्वाच्या दुरुस्त्या
* कारखाना कायद्यात सुधारणा
* ओव्हरटाईमचे अधिक नियमबद्ध स्वरूप
* कामगार संमतीशिवाय ओव्हरटाईम नाही
* वाढीव कामाचे योग्य मोबदले आणि सवलती
* आरोग्य, विश्रांती व रजा याबाबत स्पष्ट नियम


