
मुंबई प्रतिनिधी
दिवाळी, दसरा आणि छठ यांसारख्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. एसटी, खासगी वाहनं आणि नियमित गाड्यांमध्ये तिकीट मिळणं कठीण ठरतं. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून तब्बल ९४४ उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येणार असून, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, लातूरसह विविध स्थानकांवरून उत्तर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रमुख गाड्यांची माहिती
* पुणे–हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट (२० सेवा)
प्रत्येक शुक्रवार पुण्यातून आणि शनिवारी निजामुद्दीनवरून गाडी सुटणार.
थांबे : लोणावळा, कल्याण, सूरत, वडोदरा, कोटा, मथुरा आदी.
* कोल्हापूर–मुंबई सीएसएमटी (२० सेवा)
बुधवारी कोल्हापूरहून, तर गुरुवारी मुंबईहून गाड्या सुटणार.
थांबे : सांगली, सातारा, पुणे, लोणावळा आदी.
* लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम (२० सेवा)
गुरुवारी मुंबईहून, शनिवारी केरळहून सुटणार.
* थांबे : ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलोर, एर्नाकुलम आदी.
* पुणे–सांगानेर जंक्शन (२० सेवा)
बुधवारी पुण्याहून, गुरुवारी सांगानेरहून गाडी धावणार.
* मुंबई सीएसएमटी–गोरखपूर (१३२ सेवा) व पुणे–गोरखपूर (१३० सेवा)
दररोज धावणाऱ्या या गाड्यांमुळे उत्तर प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार.
* लोकमान्य टिळक टर्मिनस–दानापूर (१३४ सेवा) आणि पुणे–दानापूर (१३४ सेवा)
बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था.
* नागपूर–समस्तीपूर (२० सेवा)
दर आठवड्याला एकदा चालणारी ही गाडी झांसी, कानपूर, छपरा मार्गे धावणार.
* दौंड–कलबुर्गी (१३६ सेवा मिळून)
अनारक्षित प्रवाशांसाठी दररोज व द्विसाप्ताहिक गाड्यांची सोय.
* लातूर–हडपसर (७४ सेवा)
लातूरकरांसाठी पुणे व परिसरात जाणं सोपं होणार.
* नागपूर–पुणे (२० सेवा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर (२० सेवा)
विदर्भ-मराठवाड्यातील प्रवाशांना थेट जोडणाऱ्या सेवा.
सणासुदीतील गर्दीला दिलासा
रेल्वेच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना जागा मिळणं सोपं होणार आहे. खासगी वाहनांचा अव्वाच्या सव्वा खर्च टाळता येईल आणि प्रवास तुलनेने आरामदायी होईल.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, या गाड्यांसाठी आरक्षण तातडीने करून ठेवावं, अन्यथा शेवटच्या क्षणी तिकीट मिळणं कठीण होऊ शकतं.
दिवाळीपूर्वी रेल्वेचे हे मोठं गिफ्ट निश्चितच प्रवाशांसाठी दिलासादायी ठरणार आहे.