
मुंबई प्रतिनिधी
खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण आज होणारे चंद्रग्रहण हे या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण ठरणार आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये हे ग्रहण पाहता येणार आहे.
मात्र, या खगोलीय घटनेसह मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं ते लालबागच्या राजाच्या विसर्जनातील विलंबाने. गिरगाव चौपाटीवर सकाळी आठ ते नऊच्या सुमारास मूर्ती दाखल झाली. पण यंदा आणण्यात आलेल्या नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. भरतीमुळे वाढलेल्या पाण्यामुळे हे शक्य झालं नाही. परिणामी मूर्ती गेली तीन तास समुद्राच्या पाण्यातच स्थिरावलेली आहे.
कोळी बांधवांसह मंडळाचे कार्यकर्ते मिळून दीड-दोन तास प्रयत्न करूनही मूर्ती तराफ्यावर ठेवता आली नाही. लाटांचा जोर पाहता हे आव्हान अधिक कठीण ठरत आहे. विसर्जन रखडल्यानं अद्याप आरतीसुद्धा करण्यात आलेली नाही. मात्र, लालबागच्या राजाचे दागिने सुरक्षितपणे काढून ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, मंडळाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं की, मूर्तीचं विसर्जन खोल समुद्रातच करण्यात येणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार दुपारी दोन ते अडीच वाजता ओहोटी होईल. पाणी कमी झाल्यावर नव्या तराफ्यावरून विसर्जनाचा प्रयत्न केला जाणार आहे.
यंदाच्या विसर्जनासाठी खास गुजरातमधून मोटराइज्ड आणि अधिक क्षमतेचा नवा तराफा मागवण्यात आला आहे. जुन्या तराफ्याला बोटींची जोड देऊन कोळी बांधव विसर्जन करत असत; मात्र या वेळी नव्या तराफ्यावर विसर्जनाची योजना आखण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे मूर्ती चढवण्यात उशीर झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं.
सध्या गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात विसर्जनाच्या प्रतीक्षेत असून, मंडळ पुढचा निर्णय काय घेणार याकडे भक्तांचे लक्ष लागलं आहे.