
मुंबई प्रतिनिधी
विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता श्रीगणेशाचे दहा दिवसांचे उत्सवमंगल वातावरण शनिवारी अनंत चतुर्दशीला अवघ्या राज्यात विसर्जनाच्या सोहळ्याने संपन्न झाले. सकाळपासूनच संततधारेच्या स्वरूपात कोसळणाऱ्या पावसातही गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा जनसागर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम तलावांकडे लोटला होता.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात, डोळ्यांत अश्रू तर ओठावर हसू घेऊन कोट्यवधी भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकांत ढोल-ताशांचा गजर, गुलाल-फुलांची उधळण, बेंजोच्या तालावर नाचणारे तरुण, फटाक्यांचा जल्लोष अशा पारंपरिक आणि आधुनिकतेच्या मिश्र स्वरूपात उत्सवाची सांगता झाली.
मुंबईतील गिरगाव, दादर, माहीम, वर्सोवा, मढ-मार्वे या समुद्रकिनाऱ्यांसह पवई, कुर्ला तलाव आणि महापालिकेने उभारलेल्या २९८ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण १७,९४४ गणेशमूर्ती व २४२ गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये १,०५८ सार्वजनिक आणि १६,८८६ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.
विसर्जन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्य मंत्री योगेश कदम, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आदी मान्यवरांनी गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहून श्रीगणेशाला निरोप दिला. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे स्वागत केले.