
मुंबई प्रतिनिधी
दहा दिवसांच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या गणेशोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला झाला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर थिरकणारे भक्त, फुलांची उधळण, जयजयकाराचे घोष, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”चा नाद – असा उत्साह ओसंडून वाहत होता. परंतु या जल्लोषाला शोककळा लागली. राज्यातील विविध ठिकाणी विसर्जनावेळी दुर्दैवी दुर्घटना घडल्या असून दहा जणांचा जीव पाण्यात बुडून गेला आहे.
जळगावात आई-वडिलांसमोर तरुण वाहून गेला
जळगाव जिल्ह्यातील निमखेडी शिवारात शनिवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास गणेश गंगाधर कोळी (२५) हा तरुण गिरणा नदीत बुडून गेला. ममुराबाद येथील कोळी कुटुंब घरगुती गणपती विसर्जनासाठी नदीपात्रात आले होते. गणेश मूर्ती घेऊन तो नदीत उतरला, मात्र गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि त्याचा अंदाज न आल्याने गणेश वाहून गेला. ही हृदयद्रावक घटना आई-वडिलांच्या डोळ्यासमोर घडल्याने परिसरात शोककळा पसरली. पोलिस व स्थानिकांनी शोधमोहीम सुरू केली असून एनडीआरएफची मदतही मागवण्यात आली आहे.
शहापूर : भारंगी नदीपात्रात पाच जणांचा बळी
ठाणे जिल्ह्यातील आसनगाव- मुंडेवाडी परिसरातील गणेश घाटावर विसर्जनावेळी मोठा अपघात घडला. भारंगी नदीत एकाच वेळी पाच जण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. यापैकी दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून तिघांचा शोध सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोरच ही दुर्घटना घडल्याने वातावरणात एकच हळहळ पसरली.
पुणे जिल्हा : भामा नदीत दोनजण वाहून गेले
पुण्यातील वाकी गावाजवळील भामा नदीत प्रियदर्शन शाळेजवळ दोन तरुण विसर्जनावेळी पाण्यात वाहून गेले. अभिषेक संजय भाकरे (२१, कोयाळी) आणि आनंद जयस्वाल (२८, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून अभिषेकचा मृतदेह मिळाला आहे, तर आनंदचा शोध सुरू आहे. फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी कार्यरत आहे.
शेल पिंपळगावात चाकणचा नागरिक बुडाला
पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव येथे विसर्जनावेळी रवींद्र वासुदेव चौधरी (४५, चाकण) हे नदीत बुडून मृत्यूमुखी पडले. गणपती मूर्ती घेऊन ते नदीत उतरले होते, मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले. त्यांच्या मृत्यूने चाकण व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बिरदवडीत विहिरीत पडून मृत्यू
सांगली जिल्ह्यातील बिरदवडी येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली. विसर्जनाच्या तयारीदरम्यान संदेश पोपट निकम (३५) हा तरुण विहिरीत पडून मृत्यूमुखी पडला. एनडीआरएफच्या जवानांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
राज्यभरात हळहळ
राज्यभरात लाखो भाविकांनी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंद लुटला. मात्र विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी आनंदाचा माहोल दुःखात परिवर्तित झाला. बुडालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या संकटामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व एनडीआरएफकडून सर्वत्र मदतकार्य सुरू असले तरी जलाशयातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने वारंवार जीवितहानी होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.