
मुंबई प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सकाळपासूनच रिमझिम सरी कोसळायला सुरुवात झाली असून लाडक्या गणरायाच्या निरोपाला पावसाची साथ मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र शुक्रवारी रात्रीपासून कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश व पूर्व राजस्थानच्या परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वायव्येकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता वाढल्याने समुद्रसपाटीपासून तब्बल ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहू लागले आहेत. पुढील काही तासांत ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पालघर, नंदुरबार, धुळे व नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत भूस्खलनाचा धोका वाढू शकतो तसेच नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, रायगड, ठाणे, जळगाव व पुणे जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी दाब क्षेत्र अधिक तीव्र झाल्यास कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची ही अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.