
नवी दिल्ली प्रतिनिधी
शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील सहा जणांच्या वाट्याला आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी शालेय शिक्षण क्षेत्रातील ४५, उच्च शिक्षणातील २१ आणि कौशल्य विकास विभागातील १६ अशा एकूण ८२ शिक्षकांना हा सन्मान देण्यात आला. प्रमाणपत्र, रौप्य पदक व ५० हजार रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना, “भारतातील शिक्षकच आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य बाळगतात,” असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सहा विजेते शिक्षक
१) डॉ. शेख मोहम्मद वकिउद्दीन शेख हमीदोद्दीन (नांदेड)
२८ वर्षांपासून विज्ञान शिकवणारे डॉ. शेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींसाठी ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवला. घराघरांत जाऊन शिक्षणाची गोडी लावली आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचे लेखन आहे.
२) सोनिया विकास कपूर (मुंबई)
एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. २ च्या मुख्याध्यापिका. कमी खर्चाच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून इतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले. Teach to Enrich या पुस्तकाच्या लेखिका. समूहाधारित शिक्षण व ICT चा वापर वाढवण्यावर भर.
३) डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (लातूर)
दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्सचे संगीत प्राध्यापक. लातूरमधील पहिले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते. गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचवले. एचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेलमधील संगीत पुस्तकाची निर्मिती.
४) डॉ. नीलाक्षी जैन (मुंबई)
शाह अँड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक. अभियांत्रिकी शिक्षणातील नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व संशोधनासाठी गौरव. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले.
५) प्रा. पुरुषोत्तम पवार (बारामती)
एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंगमधील प्राध्यापक. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागरूकता व कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न.
६) अनिल रामदास जिभकाटे (नागपूर)
संत जगनाडे महाराज शासकीय आयटीआय, नागपूरमधील प्रशिक्षक. व्यावसायिक कौशल्याद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी ७०० हून अधिक सत्रांचे आयोजन.
या सहा शिक्षकांच्या कार्याने महाराष्ट्राचा मान राष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावला आहे.