
मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवाचा उत्साह आता परमोच्च बिंदूवर पोहोचला आहे. घरगुती आणि सात दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर आता भाविकांनी सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेचाच पर्याय अधिकाधिक मुंबईकरांना सोयीस्कर ठरत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे प्रशासन पुढे सरसावले असून गणेशभक्तांचा प्रवास आणखी सुकर करण्यासाठी जादा लोकल्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेवर २२ विशेष लोकल
मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते ठाणे/कल्याणदरम्यान गुरुवार मध्यरात्रीपासून शनिवार मध्यरात्रीपर्यंत तब्बल २२ जादा लोकल धाववण्याची घोषणा केली आहे.
सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल: रात्री १.४० वा., ३.२५ वा. सुटणार
सीएसएमटी-ठाणे विशेष लोकल: रात्री २.३० वा. सुटणार
कल्याण-सीएसएमटी विशेष लोकल: रात्री १२.०५ वा. सुटणार
ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल: रात्री १.०० वा. व २.०० वा. सुटणार
पश्चिम रेल्वेवर १२ जादा गाड्या
अनंत चतुर्दशीच्या रात्री (शनिवार मध्यरात्र ते रविवार पहाट) पश्चिम रेल्वेवरून १२ विशेष लोकल्स सोडण्यात येतील.
चर्चगेटहून विरारकडे १.१५, १.४५, २.१५, २.४५, ३.१५ व ३.४५ वाजता लोकल सुटतील.
विरारहून चर्चगेटकडे १२.१५, १२.३०, १.००, १.३०, २.०० व ३.०० वाजता विशेष लोकल धावतील.
हार्बर मार्गही सज्ज
हार्बर रेल्वेनेही गणेशभक्तांसाठी खास तयारी केली आहे. अनंत चतुर्दशीच्या रात्री एकूण ४ विशेष लोकल्स चालवण्यात येतील.
सीएसएमटीहून पनवेलकडे रात्री १.३० व २.४५ वाजता सुटणार
पनवेलहून सीएसएमटीकडे रात्री १.०० व १.४५ वाजता सुटणार
गणेशभक्तांसाठी दिलासा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी हजारो भाविक रात्रभर रस्त्यावर असतात. वाहतूक कोंडीमुळे त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून घेतलेला हा निर्णय भाविकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.