
पुणे प्रतिनिधी
सिंहगड रस्त्यावर वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला आहे. राजाराम पुलापासून फन टाईम थिएटरपर्यंत उभारण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या उड्डाणपुलामुळे आतापर्यंत ३० मिनिटांत पार होणारा प्रवास अवघ्या ५ ते ६ मिनिटांत पूर्ण होणार आहे. धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटीसह बेंगळुरू-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांना आता सुसाट गतीने मार्गक्रमण करता येणार आहे.
लोकार्पणावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन टप्प्यांत बांधकाम
या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी झाला होता. पुणे महापालिकेमार्फत तीन टप्प्यांत बांधकाम पूर्ण करण्यात आले.
पहिला टप्पा : राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल (खर्च : रु. १५ कोटी)
दुसरा टप्पा : विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा २.१ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च : रु. ६१ कोटी)
तिसरा टप्पा : वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा १.५ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च : रु. ४२ कोटी)
एकूण ११८.३७ कोटी रुपयांचा खर्च करून प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
अतिरिक्त सुविधा
उड्डाणपुलाखालील रस्त्याचे तीन लेनमध्ये सुयोग्य विकसन, प्रशस्त पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दुभाजकाचे सुशोभीकरण ‘सीएसआर’ अंतर्गत दोन खासगी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले असून पुढील पाच वर्षे याच संस्थांकडून त्याची देखभाल केली जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या या उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.