नागपूर प्रतिनिधी
शासनाने कोट्यवधी रुपयांची थकबाकी न दिल्यामुळे नागपुरातील एका कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. पी. व्ही. वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (५०, रा. राज नगर) असे त्यांचे नाव असून, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर शासकीय कामांसाठी त्यांचे सुमारे ३० ते ४० कोटी रुपये शासनाकडे थकीत होते.
राज्यातील ठेकेदारांची थकबाकी ८९ हजार कोटींवर गेल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सांगलीत काही महिन्यांपूर्वी एका कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता नागपुरातील ही घटना घडल्याने ठेकेदार संघटनांचा संताप उफाळून आला आहे.
आर्थिक कोंडीमुळे टोकाचे पाऊल
वर्मा हे नागपुरातील निवासस्थानी एकटेच राहत होते. उसनवारीवर घेतलेले साहित्य व इतर देणीदारांची पैशासाठीची धडपड सुरू असतानाच शासनाकडून देयक न मिळाल्याने ते प्रचंड तणावाखाली होते. अखेर त्यांनी आत्महत्या केली. याचा तपास पोलिस करीत आहेत.
“शासनाच्या बेताल धोरणामुळे आत्महत्या”
“राज्यात शेतकऱ्यांप्रमाणेच आता कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. शासनाने तातडीने थकीत देयके दिली नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होईल,” असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.


