
मुंबई प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. आगामी काळात आंदोलकांची संख्या वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
“माझा जीव गेला तरी चालेल, पण आरक्षण घेऊनच थांबणार,” असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, आणखी मराठा समाज मुंबईकडे कूच करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनाही आक्रमक भूमिकेत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सुट्टीवरील पोलिसांना पाचारण
नायगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी जारी केलेल्या पत्राद्वारे रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा वा गैरहजेरीवर असलेले सर्व पोलिस तातडीने कर्तव्यावर रुजू व्हावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि आंदोलन या दोन कारणांमुळे मुंबई पोलिसांवर ताण वाढला आहे. त्यामुळे पोलिस दलाची संपूर्ण ताकद रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
आंदोलकांसाठी वाहनव्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची मोठी गरज भासणार आहे. याच कारणास्तव खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता सुट्टीवर असलेले सर्वच मुंबई पोलीस पुन्हा सेवेत हजर होणार आहेत.