
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा बांधवांमुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आंदोलन चिघळत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही यावर भाष्य करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोट ठेवलं.
राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर असताना माध्यमांनी त्यांना मराठा आंदोलनावर प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले, याचंही उत्तर शिंदेंना विचारा. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, मागच्या वेळी नवी मुंबईत गेले तेव्हा शिंदेंनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का?” असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना कात्रीत पकडले.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल तासभर बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासह आगामी महापालिका निवडणुकांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांनी मांडलेली प्रमुख मागणी, ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण, यावर दोघांमध्ये विशेष चर्चा झाली. हा प्रश्न मध्यस्थीच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवता येईल, यावर शाह यांनी शिंदेंसोबत विचारविनिमय केल्याचे समजते.