मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा शुक्रवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाच्या विळख्यात अडकली. मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ,बदलापूरदरम्यान मालगाडीला झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येत आहेत.
Due to a technical issue in a goods train engine between AMBERNATH (ABH) – BADLAPUR (BUD) on the DN local line, train services are affected between AMBERNATH and BADLAPUR. Our team is working to resolve the issue at the earliest.
We sincerely regret the inconvenience caused.— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) August 29, 2025
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. बदलापूर आणि कर्जतदरम्यान लोकल सेवा ठप्प असल्याने अनेक प्रवासी स्टेशनवरच अडकून पडले. काहींना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागली.
डीआरएम यांनी सामाजिक माध्यमांवर दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, “अंबरनाथ,बदलापूरदरम्यान मालगाडीत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जतला जाणाऱ्या लोकल्स अंबरनाथपर्यंतच थांबवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगीर आहोत.”
बिघाड दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेचे अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. मात्र तोपर्यंत कर्जतमार्गावरील लोकल सेवा विस्कळीत राहणार आहे.
प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला पुन्हा एकदा अडथळा आल्याने नाराजी व्यक्त होत असून, “मुंबईकरांच्या जीवनरेषेवर वारंवार बिघाड होतोय, प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय शोधायला हवेत” अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


