
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रेल्वेचा प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र गोरखपूर-मुंबई कुशीनगर एक्स्प्रेसमधून आलेल्या एका घटनेने प्रवाशांचे हृदय पिळवटून टाकले. लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचलेल्या या गाडीच्या एसी कोच बी-२ मधील टॉयलेटमध्ये कचऱ्याच्या डब्यात ५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. या मुलाचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या प्रकरणी मुलाचा मावसभाऊ संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रवाशांनी दिला संशयास्पद हालचालींचा इशारा
काही प्रवाशांना बाथरूमजवळ हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवले. त्यानंतर आरपीएफ जवानांनी धाव घेत तपासणी केली असता हा मृतदेह आढळला. मृतदेह लपवण्यासाठी आरोपीने कचऱ्याचा डबा वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
धावत्या गाडीत लहान मुलाचा मृतदेह सापडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळी कोच सील करून प्रवाशांची चौकशी केली. “अशा गंभीर प्रकरणात एकाही पुराव्याकडे दुर्लक्ष होणार नाही,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अपहरणानंतर हत्या ?
जीआरपीने तपास सुरू केला असून, सुरुवातीच्या तपासात मुलाचे अपहरण त्याच्याच मावसभावाने केले, त्यानंतर हत्या केल्याचा संशय बळावला आहे. अनेक लोकांची चौकशी सुरू असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.