
नाशिक प्रतिनिधी
नाशिक रोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी चौघांना गुन्हे शोध पथकाने पळसे (ता. नाशिक) येथे रंगेहात पकडले. पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला असून एक जण अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
अटकेत घेतलेल्यांची नावे अशी – रवीकुमार भोई (२७, अंबरनाथ, ठाणे), शिवा विक्रम वैदू (३६, आनंदनगर, जळगाव), आकाश गोपाळ वैदू (३८, पाचोरा, जळगाव) आणि विष्णू शंकर भोई (३०, ठाणे). तर श्याम विष्णू भोई हा संशयित फरार झाला आहे.
हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित मंडळी ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतात (टेंभेमळा, एमआयडीसी, पळसे) थांबली असल्याचे कळताच पोलिसांनी छापा टाकला. या वेळी चौघांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईत २८ छोटे चाकू, एक कोयता, दोरी आणि मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक किरण कोरडे, संदीप पवार व पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.