
पटना वृत्तसंस्था
भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेला एक सरकारी इंजिनिअर पैसे वाचवण्यासाठी अशा थराला पोहोचला की, रात्रभर स्वतःच्या घरात बसून कोट्यवधी रुपयांच्या नोटा जाळत राहिला. तरीही पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही. उलट जितका पैसा जाळला त्यापेक्षा जास्त पैसा पोलिसांनी हाती लावला!
बिहारमधील हा प्रकार ऐकून संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कारनाम्यामागचं नाव आहे विनोद राय, सीतामढी विभागातील सरकारी इंजिनिअर.
गुरुवारी रात्री तो प्रचंड रोकड घेऊन पटना गाठण्याच्या तयारीत होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला खबर मिळताच पथकाने त्याचा माग काढला. पण त्याआधीच रायने रोकड आपल्या घरी नेली.
छाप्याची भीती डोक्यात घोळू लागली… आणि तातडीने पुरावे नाहीसे करण्यासाठी त्याने नोटांच्या गठ्ठ्यांना आगीच्या भक्ष्याला देणं सुरू केलं. वरच्या मजल्यावर खोलीत रात्रीभर हा “नोटा जाळण्याचा मेळावा” सुरू होता.
रायची पत्नी खाली थांबून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करत होती. पोलिस घराबाहेर पोहोचले असता तिनं ‘मी एकटीच आहे’ असं सांगून पथकाला अडवलं. त्यामुळे कारवाईसाठी सकाळची प्रतीक्षा करावी लागली.
मात्र दिवस उजाडताच आर्थिक गुन्हे शाखेने घरात धडक मारली… आणि दृश्य पाहून सगळे चकित झाले.
घरातून २-३ कोटी रुपयांची जळालेली रोकड आढळली
साडे बारा लाखांच्या अर्धवट जळालेल्या नोटा खोलीत विखुरलेल्या होत्या
बाथरूमच्या पाईपमध्ये नोटांची राख सापडली
एवढं करूनही ३९ लाख रुपये पाण्याच्या टाकीत सुरक्षित ठेवलेले पोलिसांच्या हाती लागले
शेवटी “जाळलेला पैसा” आणि “वाचवलेला पैसा” दोन्ही पुरावा बनून रायच्या गळ्यातील फास ठरला.
आता या इंजिनिअरवर केवळ भ्रष्टाचाराचाच नाही, तर पुरावे नष्ट करण्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे.
भ्रष्ट पैशाने सुख उपभोगायचं स्वप्न पाहणारा हा सरकारी अधिकारी, आता कारागृहाच्या भिंती मोजत बसणार हे नक्की!