
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या डोक्याला गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः ताप झाला आहे. कोणत्याही अपडेटशिवाय त्यांच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग्ज अचानक बदलल्या आहेत. विशेषतः विवो, रेडमी, वनप्लस, पोको आदी ब्रँडच्या युजर्सना याचा फटका बसला असून सोशल मीडियावर याबाबत तक्रारींचा पाऊस पडतो आहे.
नेमकं काय बदललं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा बदल फक्त त्या युजर्सच्या फोनमध्ये झाला आहे ज्यामध्ये Google Phone App डायलर अॅप म्हणून सेट केलेले आहे. Google ने आपल्या Phone अॅपमध्ये Material 3 Expressive रीडिझाइन आणले असून ते हळूहळू सर्व युजर्सपर्यंत पोहोचू लागले आहे.
नवीन डिझाइनमध्ये Favorites आणि Recents एकत्र करून Home टॅब करण्यात आला आहे. या टॅबमध्ये कॉल हिस्ट्रीसोबत वरच्या बाजूस फेवरेट कॉन्टॅक्ट्स कॅरोसेल स्वरूपात दिसतात. कीपॅडही स्वतंत्र टॅबमध्ये हलवण्यात आला असून नंबर पॅड अधिक स्वच्छ आणि गोलाकार डिझाइनमध्ये दिसतो.
इनकमिंग कॉल स्क्रीनला देखील नवीन लूक देण्यात आला आहे. आता कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्ट करण्यासाठी हॉरिझॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅपचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तर In-call इंटरफेसमध्ये कॉलदरम्यानचे बटण पिल-शेपमध्ये दिसते आणि एंड कॉल बटण अधिक मोठे करण्यात आले आहे.
युजर्स नाराज, पण पर्याय उपलब्ध
या बदलामुळे अनेक युजर्स वैतागले असले तरी फोन पुन्हा जुन्या स्वरूपात आणण्याचा पर्याय आहे. त्यासाठी कॉल अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Clear Cache करून नंतर वरच्या तीन डॉट्सवर टॅप करून Uninstall Update निवडल्यास जुनी सेटिंग पुन्हा कार्यान्वित होऊ शकते.
दरम्यान, या नव्या डिझाइनबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून अनेकांना हे फीचर यूजर-फ्रेंडली वाटत असले तरी पारंपरिक स्वरूपाला सरावलेले युजर्स मात्र संतप्त झालेले दिसत आहेत.