
पुणे, प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या सोयीसाठी आयोगाने अर्ज सादरीकरणास मुदतवाढ जाहीर केली आहे.
२९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी पदांसाठी ९ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे आवश्यक कागदपत्रे मिळवण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन आयोगाने अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासह, चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना १ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर (mpsc.gov.in, mpsconline.gov.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय, पदसंख्या व आरक्षणाबाबत संबंधित विभागांकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास, त्याचा समावेश परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्या बदलण्याची अथवा नवीन संवर्ग जोडण्याची शक्यता आयोगाने स्पष्ट केली आहे.
तसेच, जाहिरातीत नमूद नसल्यामुळे किंवा पदसंख्या कमी असल्यामुळे अर्ज न केलेल्या उमेदवारांची तक्रार नंतर मान्य केली जाणार नाही, असेही आयोगाने ठामपणे सांगितले आहे.
या निर्णयामुळे अर्जासाठी गडबडीत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.