
मुंबई प्रतिनिधी
“श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीमुळे नवीन पिढीला आपल्या दैदिप्यमान इतिहासाशी जोडण्याचे मोठे कार्य झाले आहे. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि पराक्रमाचे प्रतीक असलेली ही तलवार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून पुढच्या पिढ्यांपर्यंत आपला वारसा नेईल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या प्रदर्शन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, मुधोजी राजे भोसले, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार संजय उपाध्याय, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार संजय कुटे, सचिव डॉ. किरण कुलकर्णी, संचालक मीनल जोगळेकर, संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नागपूरच्या भोसल्यांचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. युनेस्को मान्यताप्राप्त १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे यांसारख्या वारशांमुळे आपण इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत.”
“मराठा साम्राज्याचा वारसा परत आणण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऐतिहासिक वस्तू परत मिळाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचाही वारसा परत आणला जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.