
मुंबई प्रतिनिधी
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज (सोमवार) मुंबईत दाखल होणार आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावातून हस्तगत केलेली ही तलवार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नुकतीच लंडनमध्ये स्विकारली होती.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि दिलेल्या पाठिंबामुळे हे शक्य झाले, मनःपूर्वक धन्यवाद!@Dev_Fadnavis https://t.co/Y2tthWBsqP
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2025
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी दहा वाजता ही तलवार स्विकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार असून त्यानंतर बाइक रॅलीसह चित्ररथातून तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे नेण्यात येणार आहे.
सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने ‘सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे या सोहळ्यास विशेष उपस्थित राहणार आहेत.
१९ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात ही तलवार व राज्यातील १२ वारसा मानांकित गडकिल्ल्यांची माहिती यांचे प्रदर्शन खुले राहील. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.