
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |ऑनलाईन शॉपिंग व डिलिव्हरी सेवांचा वाढता वापर लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. पण, परळमध्ये डिलिव्हरीच्या निमित्ताने घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला. वारंवार डोअरबेल वाजवल्याचा राग मनात धरून ग्राहकाने डिलिव्हरी बॉयसमोर थेट हवेत गोळी झाडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
ही घटना शुक्रवारी संध्याकाळी परळच्या नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन इमारतीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सौरभ कुमार यांनी ऑनलाईन मेडिकल अॅपद्वारे औषधांची ऑर्डर केली होती. औषधे घेऊन डिलिव्हरी बॉय त्यांच्या दाराशी पोहोचला. बेल वाजवूनही दार न उघडल्याने त्याने पुन्हा बेल दिली. यामुळे सौरभ संतापला. त्याने दार उघडताच आपल्या एअर रायफलमधून हवेत गोळी झाडली.
या घटनेत डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौरभ कुमारला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सौरभने डिलिव्हरी बॉयने वारंवार बेल वाजवल्याने रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याचे सांगितले.
डिलिव्हरी बॉयने मात्र आपले कर्तव्य पार पाडत असतानाच अचानक गोळीबार झाल्याने आपल्याला जीवघेणी भीती बसल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
शेजाऱ्यांनी सांगितले की, सौरभ नेहमीच लवकर रागावतो, पण अशा प्रकारची घटना त्यांच्या परिसरात पहिल्यांदाच घडली असून पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे त्यांनी कौतुक केले.