
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना मानखुर्दमध्ये घडलेल्या एका अपघाताने उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले आहे. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरात दहीहंडीचा रोप बांधताना ३२ वर्षीय गोविंदाचा तोल जाऊन तो खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची ओळख जगमोहन शिवकुमार चौधरी अशी झाली आहे.
३० गोविंदे जखमी
मुंबईतील विविध भागांमध्ये सकाळपासून दहीहंडीचे कार्यक्रम पार पडत आहेत. ढोल-ताशांचा गजर, उंचच उंच मानवी मनोरे, गोविंदांचा उत्साह यामुळे वातावरण दणाणले होते. मात्र या जल्लोषात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. आतापर्यंत तब्बल ३० गोविंदे जखमी झाल्याचे समोर आले आहे. यापैकी १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
उत्सवाला गालबोट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर राजकीय नेते आणि अनेक अभिनेते-सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मुंबईत दहीहंडीचे सोहळे उत्साहात पार पडत होते. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनीही ठिकठिकाणी वातावरण रंगतदार झाले होते. विक्रमांचे मानवी मनोरे उभारले जात असतानाच मानखुर्दमधील दुर्घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मानखुर्दमधील बाल गोविंदा पथकावर शोककळा पसरली असून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोविंदाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.