
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईकरांचे आयुष्य विस्कळीत केले आहे. विक्रोळीतील पार्कसाइट परिसरात शनिवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. डोंगरावरून दरड कोसळून झोपडपट्टीतील मिश्रा कुटुंबीयांचे घर चेंगरले गेले. यात सुरेक्ष मिश्रा आणि शालू मिश्रा या बापलेकीचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Maharashtra | 2 dead and 2 injured as landslide hits Jankalyan Society, Varsha Nagar, Vikhroli Park Site, Vikhroli (W) in Mumbai: BMC
— ANI (@ANI) August 16, 2025
ही घटना पहाटे साडेदोनच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दल, महानगरपालिकेचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी धावले. ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र सुरेक्ष मिश्रा (वडील) आणि शालू मिश्रा (मुलगी) यांना जीव वाचवता आला नाही. आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या मायलेकांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंगरावर उभारलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने महापालिकेकडून परिसरातील काही भागांना याआधीच धोकादायक घोषित केले होते. घरं रिकामी करण्यासाठी नोटीसाही देण्यात आली होती. तरीही अनेक कुटुंबे अद्यापही तिथे वास्तव्यास होती. या दुर्घटनेनंतर महापालिकेने काही घरांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई आणि उपनगरात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरकपारीलगतच्या वस्त्यांना धोका कायम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.