
मुंबई प्रतिनिधी
दादरमधील कबूतरखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंदिस्त केल्यानंतर जैन समाजाकडून घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे. जैन मुलींकडून शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीने बंदीच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन छेडले. मात्र, पोलिसांनी लाठीमार आणि बळाचा वापर करून आंदोलन पांगवले.
या कारवाईत मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमुख जखमी झाले. “मराठीसाठी आवाज उठवला तर पोलिस आमचं रक्त काढतात, हात मोडतात,” असा थेट आरोप त्यांनी केला.
“लोढासारखे मंत्री आमच्याकडे नाहीत, हे दुर्दैव”
देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांच्यावर थेट टीका करत,
“जैन समाज जेव्हा चाकू-सुर्या घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा पोलीस कुठे होते? आमच्या सोबत लोढासारखे मंत्री नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री हे फक्त एका विशिष्ट समाजासाठी आहेत,”
असा आरोप केला.
त्यांनी इशारा दिला की, “कायद्याचं उल्लंघन सुरूच राहिलं तर आम्ही महामोर्चा काढू. हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा आहे. मराठ्यांमुळे हिंदुत्व जपलं गेलं आहे.”
आंदोलनात झटापट, पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप
आंदोलनादरम्यान पोलिसांशी जोरदार झटापट झाली. देशमुख म्हणाले, “मी पोलिसांसाठी आलो होतो, पण त्यांनी मला जखमेचं बक्षीस दिलं.” त्यांनी पुढे सांगितलं की, राजकीय पक्षांनी मराठी जनतेच्या बाजूनं उभं राहावं, पण कोणीच पुढे आलं नाही.
निवेदनातील गंभीर आरोप
मराठी एकीकरण समितीच्या निवेदनात म्हटलं आहे की —
* एका विशिष्ट समाजाने कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला.
*;शस्त्रांची भाषा करून असंतोष निर्माण केला.
* कबूतरखाना तोडफोडीचा प्रकार न्यायालयाचा अवमान असून, मुंबई महापालिका कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा आहे.
समितीने पोलिसांना मागणी केली की,
* सर्व संबंधितांवर तत्काळ एफआयआर दाखल करावा.
* पक्षपात न करता कठोर कारवाई करावी.
* जामीनाला विरोध करावा आणि न्यायालयाचा मान राखावा.
या प्रकरणामुळे दादर परिसरात तणाव निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे परिस्थिती अजून तापण्याची चिन्हे आहेत.