
* दोन टक्के महागाई भत्ता वाढणार
* लाखो कुटुंबांना दिलासा
मुंबई प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावरच महायुती सरकारनं राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गोड बातमी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महागाई भत्त्यात तब्बल 2 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारनं मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 2% ने वाढवल्यानंतर आता राज्य सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर गेला आहे.
जानेवारीपासून थकबाकी – थेट खात्यात
1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढीचा फायदा लागू होणार असून, कर्मचाऱ्यांना जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांची डीएची थकबाकी एकरकमी दिली जाणार आहे.
या लाभाच्या यादीत —
राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी
जिल्हा परिषद व निमसरकारी कर्मचारी
पात्र पेन्शनधारक अधिकारी-कर्मचारी
सर्वांचा समावेश आहे.
पेन्शनधारकांनाही मोठा फायदा
पेन्शनधारकांसाठी ‘डीआर’ (Dearness Relief) मध्येही तितकीच वाढ होणार आहे. यामुळे वाढलेल्या महागाईच्या तडाख्यातून पेन्शनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
केंद्राकडून अजून एक गोड बातमी येण्याची शक्यता
केंद्रातील मोदी सरकार दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा महागाई भत्ता 3% ने वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज खरा ठरल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचेल.
स्वातंत्र्यदिनाआधी आलेली ही वाढ म्हणजे सरकारी नोकरदार आणि पेन्शनधारक कुटुंबांसाठी ‘खऱ्या अर्थानं बोनस’ ठरणार आहे.