
कोल्हापूर प्रतिनिधी
रक्षाबंधन — भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आयुष्यभराच्या साथिचा सण. पण यंदाचा सण गुडाळ (ता. राधानगरी) येथील शालाबाई कोथळकर आणि त्यांचा भाऊ महादेव पांडुरंग पाटील (वय ५१) यांच्यासाठी शोकांतिका घेऊन आला. सकाळी आनंदात साजरे झालेले औक्षण, राखी आणि गप्पांचा सोहळा काही तासांत अश्रूंनी आणि हंबरड्यांनी भरलेल्या दुर्दैवी क्षणांत बदलला.
सकाळी अकराच्या सुमारास शालाबाई आपल्या भावाला राखी बांधून, औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत होत्या. दोघांच्या गप्पाही रंगल्या. मात्र, औक्षणानंतर महादेव वैरण आणण्यासाठी पठार नावाच्या शेतात गेले आणि परत आलेच नाहीत. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली.
ते शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडले. तातडीने भोगावतीतील खासगी रुग्णालयात, नंतर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं; पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मृत्यूची पुष्टी केली.
पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. शालाबाई राखी बांधायला आल्या होत्या, तर महादेव यांच्या पत्नी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी धामोड येथे माहेरी गेल्या होत्या. माहेरच्या गप्पांमध्ये रमलेल्या त्यांच्या हातात अचानक पतीच्या मृत्यूची बातमी आली… आणि क्षणात आनंदाचे वातावरण काळ्याकुट्ट शोकात बदललं.