
भंडारा प्रतिनिधी
भंडारा शहरात शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री घडलेली दुहेरी हत्याकांडाची घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. शहरातील मध्यवर्ती मुस्लिम लायब्ररी चौकात पाच-सहा अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात दोन तरुणांना गाठून चाकू व लोखंडी रॉडने सपासप वार करत निर्दयीपणे ठार मारले. वाचवायला गेलेल्या मित्रालाही न जुमानता आरोपींनी त्याचाही जीव घेतला.
या घटनेत वसीम उर्फ टिंकू खान (३५) आणि शशांक गजभिये (३०, दोघेही मुस्लिम लायब्ररी संकुल निवासी) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
गर्दीच्या चौकात रक्तरंजित खेळ
शनिवारी रात्री सुमारास दहा वाजता टिंकू खान व शशांक गजभिये हे गाडीतून खाली उतरताच दबा धरून बसलेल्या पाच-सहा हल्लेखोरांनी गर्दीचा फायदा घेत दोघांवर तुटून पडले. धारदार चाकू आणि लोखंडी रॉडने डोक्यावर व छातीवर वार करत त्यांना क्षणात रक्ताच्या थारोळ्यात ढकलले. डोळ्यांसमोर घडणारा हा प्रकार पाहून परिसरातील लोक सुन्न झाले, तर आरोपींनी निःशंकपणे घटनास्थळ सोडले.
वाचवायला गेलेला मित्रही बळी
हल्ला होताना शशांक गजभिये हे टिंकू खानला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हल्लेखोरांनी त्यांनाही लक्ष्य करत क्रूर हल्ला केला. त्यामुळे दोघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांची तातडीची धाव, शहरात तणाव
घटनेची माहिती मिळताच भंडारा शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे. मध्यवर्ती चौकात घडलेल्या या दुहेरी खुनामुळे शहरात तणाव व भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्या वादाचा शेवट मरणाने
प्राथमिक तपासानुसार, टिंकू खान आणि हल्लेखोर यांच्यात मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद सुरू होता. शनिवारी रात्री कार्यालयाबाहेर झालेला वाद चिघळत गेला आणि तो रक्तरंजित हत्येत परिवर्तित झाला.
या घटनेने भंडाऱ्याच्या मध्यवर्ती चौकात सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांकडून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.