
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता येत्या २४ तासांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मोठी घोषणा करत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हप्त्याचे वाटप सुरू झाल्याची माहिती दिली.
रक्षाबंधनाआधीच आर्थिक गिफ्ट!
“लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला द्यायला सुरुवात झाली आहे. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,” असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
महायुती सरकारच्या या लोकप्रिय योजनेत दरमहा १,५०० रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, जुलैचा हप्ता वेळेत न आल्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता मात्र रक्कम मिळणार असल्याने त्या खूश आहेत.
बोगस लाभार्थ्यांवर सरकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
या योजनेचा लाभ काही बोगस व्यक्तींनी घेतल्याचंही उघड झालं आहे. काही ठिकाणी बांगलादेशी नागरिक आणि पुरुषांनीही या योजनेत नाव नोंदवल्याचं निदर्शनास आलं आहे.
“माहिती व तंत्रज्ञान विभागाने बोगस लाभार्थ्यांचा तपशील आम्हाला दिला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी १५ दिवस लागणार आहेत. यानंतर जर पुरुष किंवा अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचं आढळलं, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही तटकरे यांनी दिला.
लाडकी बहीण योजना – सुपरहिट स्कीम!
महिला सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीतच लाखो महिलांनी यामध्ये नाव नोंदवून दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक आधार मिळवला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.