मुंबई प्रतिनिधी
मुंबई | खोट्या बलात्काराच्या आरोपाच्या माध्यमातून एका आयटी व्यावसायिकाकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका बड्या बँकेतील महिला कर्मचाऱ्यास अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी ही कारवाई केली असून डॉली अरविंद कोटक असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
डॉली कोटक आरबीएल बँकेत कार्यरत होती. तीने तिच्या माजी सहकाऱ्याला बनावट बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पीडितेच्या बहिणीकडून कोर्टाच्या आवारातच ना हरकत प्रमाणपत्रासाठी तब्बल १ कोटींची मागणी केली गेल्याचं समोर आलं आहे.
Mumbai's Charkop Police arrested Dolly Kotak, an RBL Bank employee, for filing a false rape case against her ex-partner, an IT professional and extorting ₹1 crore for a 'No Objection' statement. Kotak, with help from three bank staff, illegally accessed the victim’s private… pic.twitter.com/UhxEv4wUY0
— IANS (@ians_india) August 7, 2025
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉली कोटकने तिच्या सहकाऱ्यावर सतत दबाव आणत खोट्या आरोपांद्वारे त्रास दिला. जामीन प्रक्रियेदरम्यान पैसे देण्याची धमकी दिली. याशिवाय, बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या आयटी व्यावसायिकाचा आणि त्याच्या पत्नीचा वैयक्तिक व आर्थिक डेटा अनधिकृतपणे मिळवण्यात आला. पीडितेच्या बँक खात्यातील मोबाईल नंबर बदलून स्वत:चा नंबर नोंदवून डॉलीने ऑनलाईन बँकिंग तपशील, जीपीएस लोकेशन, वैयक्तिक फोटो आणि अन्य माहिती मिळवली होती.
मे २०२४ मध्ये पीडित व्यक्तीला ‘तू वेदनेने मरशील, पैसे दे नाहीतर तुरुंगात मरशील’ असा धमकीचा मेसेजही पाठवण्यात आला होता. इतक्यावरच न थांबता, डॉलीने पीडिताच्या कंपनीच्या एचआर विभागाला खोटे ईमेल करून त्याची नोकरीही घालवली. या सगळ्या प्रकारांमुळे मानसिक त्रासात असलेल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला.
पोलिसांकडून सुरुवातीला कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पीडित व्यक्तीने थेट बोरिवली दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर चारकोप पोलिसांनी डॉली कोटक, एचडीएफसी बँकेतील कर्मचाऱी प्रमिला वास आणि सागर कोटक यांच्या विरोधात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १७५(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आर्थिक व सायबर फसवणुकीच्या दृष्टीने अधिक माहिती घेतली जात आहे.


