
सातारा प्रतिनिधी
राज्यातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असली तरी, सातारा आरटीओ विभागांतर्गत केवळ ३५ टक्के वाहनांवरच या प्लेट्स बसविल्या गेल्या आहेत. उर्वरित वाहनांवर प्रक्रिया सुरू असून, वाढीव मुदत देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे वाहनांची ओळख सहज पटणार असून, बनावट किंवा बदललेल्या नंबरप्लेटमुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसेल. राज्य सरकारने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना या प्लेट बसविण्याचे आदेश दिले आहेत.
नोंदणी आणि शुल्क
वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ व तारीख निश्चित करावी लागते. या प्रक्रियेसाठी दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये आणि इतर सर्व वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जात आहे.
सुविधा वाढल्या; प्रतीक्षाही कमी
सुरुवातीला जिल्ह्यात अधिकृत सेंटरची संख्या कमी असल्याने वाहनधारकांना मोठ्या रांगा आणि तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, मागील महिनाभरात सेंटरची संख्या वाढवण्यात आल्याने तासाभरातच नंबरप्लेट बसवून मिळत आहे.
“वाहनचालकांनी अधिकृत ठिकाणी नोंदणी करूनच नंबरप्लेट बसवावी. गेल्या महिन्यात सेंटर वाढल्यामुळे प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे,”
असे साताऱ्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी सांगितले.