
नासाचे अधिकृत स्पष्टीकरण; भारतात नाही दृश्य
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एक आश्चर्यजनक दावा वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी जगात तब्बल ६ मिनिटांसाठी अंधार पसरणार असल्याचे सांगितले जात आहे. दावा करताना याला १०० वर्षांतून एकदा घडणारी घटना असेही म्हटले जात आहे. मात्र, ही माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे.
खरे काय आहे?
या व्हायरल दाव्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, खऱ्या तारखेचा खुलासा केला आहे. नासाच्या माहितीनुसार, शतकातील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण खरेच होणार आहे, पण २०२५ मध्ये नव्हे, तर २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.
२०२७ मध्ये सहा मिनिटांचा अंधार
या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणात पृथ्वीवर सहा मिनिटं आणि २२ सेकंदांपर्यंत अंधार पसरणार आहे. हे ग्रहण अत्यंत दुर्मिळ असून १९९१ नंतर पहिल्यांदाच एवढा मोठा आणि दीर्घकाळ चालणारा अंधार अनुभवायला मिळणार आहे. पुढचं असं सूर्यग्रहण २११४ मध्ये घडेल.
नासाच्या अहवालानुसार, हे पूर्ण सूर्यग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या काही भागात दिसणार आहे. ग्रहणाचा संपूर्ण पट्टा २५८ किलोमीटर इतका रुंद असून, १५,२२७ किलोमीटर लांबीचा हा भाग पृथ्वीवर झाकला जाणार आहे.
ग्रहण कुठे दिसणार?
या ग्रहणाचा अनुभव स्पेन, झिब्राल्टर, मोरक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सुदान, सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया या देशांतील काही भागांमध्ये घेता येणार आहे. या भागांत दिवसाचा अंधार जाणवणार आहे. याशिवाय आफ्रिका, युरोप व आशियाच्या काही भागांत हे आंशिक स्वरूपात पाहायला मिळेल.
भारत आणि इतर देशांमध्ये काय?
भारतासह उत्तर अमेरिका आणि इतर देशांमध्ये हे पूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही. मात्र काही देशांमध्ये त्याचे आंशिक दर्शन होण्याची शक्यता आहे.
२०२५ मध्ये सूर्यग्रहण आहे का?
होय. २१ सप्टेंबर २०२५ रोजी एक खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. यात सूर्याचा केवळ एक भाग चंद्रामागे झाकला जाणार आहे. त्यामुळे सूर्य अर्ध्या चंद्रासारखा दिसेल. हे ग्रहण तुलनेने अल्प प्रभावी असून त्याचा अंधार स्पष्टपणे जाणवणार नाही.
२ ऑगस्ट २०२५ रोजी अंधार पडेल, असा सोशल मीडियावरील दावा चुकीचा आहे. खऱ्या अर्थाने सहा मिनिटांचा अंधार २ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे आणि तोही काही निवडक देशांपुरता मर्यादित असणार आहे.
वाचकांनी अशा खोट्या आणि अपूर्ण दाव्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे.
विश्वास ठेवा वैज्ञानिक माहितीवर, अफवांवर नव्हे!