
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा पालट घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात राज्य शासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दृष्टिकोन व्यापक होणार आहे. एससीईआरटीने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा सध्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांना त्यावर सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘परिसर अभ्यास’ ऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग’
नवीन अभ्यासक्रमानुसार, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परिसर अभ्यास’ या विषयाच्या जागी ‘आपल्या सभोवतालचे जग (भाग १ आणि २)’ हा विषय शिकवण्यात येणार आहे.
* भाग १ मध्ये विज्ञान आणि भूगोलाचा समावेश
* भाग २ मध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्राचा समावेश असेल
तसेच, इयत्ता चौथीसाठी ‘शिवछत्रपती’ हे लोकप्रिय पाठ्यपुस्तक कायम ठेवण्यात आले आहे.
सहावीतून विषय स्वतंत्र, नववीतून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र
इयत्ता सहावीपासून इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे विषय स्वतंत्रपणे शिकवले जाणार आहेत. तर नववीपासून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय स्वतंत्र अभ्यासक्रम स्वरूपात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती असतील.
व्यावसायिक शिक्षणात आधुनिक कौशल्यांचा समावेश
राज्य सरकारने शिक्षणास व्यावसायिक दृष्टी देण्याचा निर्णयही घेतला आहे. इयत्ता सहावीतूनच व्यावसायिक शिक्षणाचा प्रारंभ होत असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित विविध कौशल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कृषी, कुक्कुटपालन, बागकाम, मेकेट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अन्नप्रक्रिया, लाकूडकाम आणि पर्यटन यांचा समावेश करण्यात आला आहे.
इयत्ता अकरावी-बारावी एनसीईआरटीच्या धर्तीवर
इयत्ता अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षणपद्धती अधिक समन्वयित व राष्ट्रीय स्तरावर सुसंगत ठरणार आहे.
राज्य शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रमातील हे बदल येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील या क्रांतिकारी बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक समर्पक, व्यावहारिक आणि राष्ट्रीय पातळीशी जोडलेलं शिक्षण मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.