
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी ठाकरे कुटुंबातील आणखी एक जवळीक लवकरच दिसणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी गणेशोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय-व्यक्तिगत संबंध नव्याने उबदार होताना दिसत आहेत. ५ जुलैच्या मराठी अभिमान मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले. त्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता याच स्नेहबंधाचा पुढचा टप्पा म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचे ‘शिवतीर्थ’वर जाणे.
राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान होतात. यंदा त्यांच्या घरी बाप्पाचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यंदा उद्धव ठाकरे देखील या दर्शनाच्या यादीत असणार आहेत.
२७ ऑगस्ट रोजी होणार ऐतिहासिक भेट?
राज्यात यंदा २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन होणार असून, त्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. ही भेट केवळ बाप्पाच्या दर्शनापुरती मर्यादित राहणार की त्यामागे युतीची बीजेही रुजणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-मनसे युतीचे संकेत?
मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत आहे. कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत उत्साह आहे. दोन्ही नेतेही युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते लवकरच होईल,’ असे सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्याच्या राजकीय गणितात नवा वळण आणणारी ही भेट ठरणार का, याकडे राजकीय विश्लेषक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे या संघर्षाची जागा ‘ठाकरे आणि ठाकरे’ या सहकार्याने घेणार का? हे येणारे दिवस स्पष्ट करतील.