
मुंबई प्रतिनिधी
राजकारणात दोन भावांमध्ये पडलेली दरी अखेर भरून निघणार का? शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल १२ वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झाले आणि या भेटीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
आज सकाळी राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्री गाठून उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघे बंधू एकाच मंचावर पाहायला मिळाले, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि उत्सुकतेचे मिश्र भाव उमटले होते.
२०१२ नंतर ही पहिलीच वेळ होती की, राज ठाकरे मातोश्रीवर आले. विशेष म्हणजे, ही भेट केवळ औपचारिक शुभेच्छांची मर्यादा ओलांडून नव्या राजकीय समीकरणांची चाहूल देणारी ठरू शकते, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची उपस्थिती हीस आणखी खतपाणी घालणारी ठरली आहे.
राज ठाकरे यांच्या या अचानक भेटीमुळे “शिवसेना-मनसे युती?” या चर्चांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. भाजपपासून दुरावत चाललेल्या ठाकरे गटासाठी ही युती राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोनही पक्षांचे विचार जवळचे असल्याने भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी चर्चाही रंगू लागली आहे.
एकंदरीतच, राज ठाकरे यांची मातोश्रीवरील ही ‘राजकीय भेट’ केवळ एक शुभेच्छा देणारी घडामोड न राहता आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. आता हे दोघे बंधू एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.