
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रावर आजपासून पुन्हा एकदा पावसाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज शुक्रवार (२६ जुलै २०२५) रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका असून काही भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at few places in the districts of South Konkan-Goa, at isolated places in the ghats areas of South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 25, 2025
कोकणावर ‘जलप्रलय’चा इशारा; मुंबईसह सहा जिल्हे अलर्टवर
कोकणात आज मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
मुंबईत सकाळी १२.३५ वाजता ४.८ मीटर उंचीची भरती होणार असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पुणे-सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; कोल्हापूर, सांगलीही धोक्याच्या झोनमध्ये
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रेड अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतही मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, धरणांच्या पातळीकडे सतत लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक प्रशासन सज्ज असून, पूर नियंत्रणासाठी विविध यंत्रणा कार्यरत आहेत.
विदर्भातही पावसाचा कहर; गोंदिया-चंद्रपूर रेड झोनमध्ये
विदर्भातील गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात प्रचंड पावसाची शक्यता आहे. भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे रंग
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित असून ढगाळ वातावरण राहील.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. सध्या नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
प्रशासन सज्ज, नागरिकांनी घ्यावी खबरदारी
राज्य आपत्कालीन विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पूरस्थिती नियंत्रणासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. NDRF व SDRF पथक सज्ज ठेवण्यात आले असून, धरणांच्या पातळीवर लक्ष ठेवले जात आहे.