
मुंबई प्रतिनिधी
राज्यात पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला असून, मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत गुरुवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून, शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत असून, उपनगरी रेल्वे सेवा देखील १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने सुरू आहे.
अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्याने हवामान विभागाने राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत पुढील १२ तास अत्यंत संवेदनशील ठरणार असून अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
रेड अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे:
रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा, सातारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे:
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि वर्धा.
या भागांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
🗓️ २५ जुलै २०२५
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती –
दुपारी १२:४० वाजता – ४.६६ मीटरओहोटी –
सायंकाळी ६:४६ वाजता – १.४० मीटर🌊 भरती –
मध्यरात्री १२:३५ वाजता (उद्या, २६ जुलै २०२५) – ४.०८…— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2025
मुंबई पोलिसांकडून नागरिकांना “घराबाहेर न पडण्याचे” आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, “फक्त अत्यंत गरजेच्या कारणासाठीच घराबाहेर पडा. सखल भागांपासून दूर रहा. किनारपट्टी भागात जाणे टाळा. वाहने सावकाश चालवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने 100 किंवा 112 क्रमांकावर संपर्क साधा.”
शहरातील काही भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक संथ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना वेळेआधी बाहेर पडण्याचे, सोबत हलका खाण्याचा खाऊ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पावसाने शेतीला दिलासा दिला आहे. अलीकडच्या दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे. पाणीटंचाई व दुबार पेरणीची भीती आता दूर झाली आहे.
राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.